पाटणा: सध्या बिहारमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पाटणा शहरात पूरस्थिती उद्भवली आहे. याचा फटका केवळ सामान्य जनतेलाच नव्हे तर मंत्र्यांनाही बसला आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (एनडीआरएफ) पूरातून सुखरुपपणे बाहेर काढले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आता पाटलीपूत्र येथील भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव अशाच एका घटनेमुळे चर्चेत आले आहेत. रामकृपाल यादव हे बुधवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील धनोरी येथे पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी गेले होते. दरधा नदीला पूर आल्यामुळे हा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. मात्र, बिहारमधील सरकारी यंत्रणा इतर भागांमध्ये जुंपल्यामुळे याठिकाणी साधी होडीही उपलब्ध नव्हती. 


त्यामुळे रामकृपाल यादव हे आपल्या समर्थकांसह ट्युबच्या साहाय्याने तयार केलेल्या तराफ्यावरून प्रवास करत होते. मात्र, हा तराफा किनाऱ्यापासून काही अंतरावर असताना उलटला. त्यामुळे रामकृपाल यादव आपल्या समर्थकांसह नदीत पडले. त्यावेळी किनाऱ्यावरील लोकांना नदीत उड्या मारून रामकृपाल यादव यांना बाहेर काढले. 


नदीतून बाहेर काढल्यानंतर रामकृपाल यादव काहीवेळ बेशुद्धही होते. मात्र, प्राथमिक उपचारानंतर ते शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनावर सडकून टीका केली. महानगरपालिका लोकांकडून कर वसूल करते. मात्र, लोकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. दानापूर परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले असतानाही याठिकाणी एनडीआरएफ किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेची मदत पोहोचलेली नाही. याठिकाणी बचावकार्यासाठी साध्या होडीचीही व्यवस्था नाही. त्यामुळेच मला तराफ्यावरून प्रवास करावा लागला. मात्र, सरकारी अधिकारी आमचे फोनही उचलत नसल्याची तक्रा रामकृपाल यादव यांनी केली.