नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानाला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी या मोहीमेत सहभागी झाले असून ते झाडू घेऊन कचरा काढतानाचा फोटो सोशल मीडियात शेअर करत असतात. लोकशाहीचे मंदीर असलेल्या संसदेबाहेर देखील असेच एक 'स्वच्छता अभियान' पाहायला मिळाले. खासदार हेमा मालिनी आणि केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे संसदेबाहेर झाडू मारत स्वच्छता अभियानात सहभागी होताना दिसल्या. पण त्यांची एकंदरीत झाडू मारण्याची पद्धत पाहता त्या सोशल मीडियात ट्रोल होत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या बाहेर नुकताच एक अनोखा नजारा पाहायला मिळाला.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या परिसरात स्वच्छता अभियान साकारण्यात आले. काही खासदारांनी हातात झाडू घेत रस्ता साफ केला. पण प्रत्येकाची झाडू हातात पकडण्याची पद्धत आणि जास्त कचरा नसलेल्या ठिकाणच्या स्वच्छता अभियानामुळे सोशल मीडियात याचे हसू होत आहे.



काहींना झाडू कसा पकडावा यात अडचण आलेली दिसते तर काहींना कचरा काढताना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. त्यात हेमा मालिनी यांचा व्हिडीओ सर्वात जास्त व्हायरल होतो. त्यात त्यांच्या झाडुचा कचऱ्याशी संबंध येत नसल्याचे दिसून येत आहे. पण तरीही त्या स्वच्छता अभियानात मग्न असलेल्या दिसून येत आहेत.