नवी दिल्ली: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी भाजपचा आक्रमक व आकर्षक प्रचार फायदेशीर ठरला होता. प्रचारातील 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा तर प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने 'अबकी बार ४०० के पार' घोषणा तयार केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३३६ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये एकट्या भाजपाने २८२ जागांवर विजय मिळवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला असा चमत्कार पुन्हा करून दाखवणे जवळपास अशक्य असले तरी मोदी सरकारने यावेळीही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मोदी सरकारची गेल्या साडेचार वर्षातील कामगिरी पाहून जनतेला पुन्हा पंतप्रधानपदी मोदींनाच बसवायचे आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. १९८४ नंतर प्रथमच एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले होते. या बहुमताचा पुरेपूर फायदा उठवत मोदी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. या निर्णयांचा आगामी निवडणुकीत भाजपला नक्कीच फायदा मिळेल. यामुळे भाजपप्रणित रालोआ आघाडी ४०० जागांचा टप्पा नक्की ओलांडेल, असा विश्वासही अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. 


मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा कोणताही परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. २०१४ मध्ये लोकांनी आमचे काम पाहिले नसतानाही फक्त मोदींवर विश्वास ठेवत २८२ जागा दिल्या होत्या. मात्र, आता लोकांसमोर नरेंद्र मोदींचे काम आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप विक्रमी जागा जिंकेल, असेही ठाकूर यांनी सांगितले.