अनेक आश्वासने दिलीत, आता हसतो आणि पुढे जातो - गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : स्वच्छ प्रतिमा आणि वादग्रस्त वक्तव्यापासून नेहमी लांब असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी मात्र, त्यांनी केलेल्या भाष्यावर अडचणीत आलेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. काँग्रेसने गडकरींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
दरम्यान, गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपची अडचण वाढणार आहे. एका मराठी वाहिनीवरील चर्चेदरम्यान त्यांनी आम्ही अनेक आश्वासने दिली होती. मात्र, ती पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी येणार नाही, म्हणून दिली होती. परंतु आम्हाला सत्ता मिळाली. त्यामुळे दिलेली आश्वासने कशी पूर्ण करणार, असे जेव्हा लोक विचारतात, त्यावेळी आम्ही हसतो आणि पुढे होतो, असे व्यक्तव्य गडकरींनी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
गडकरी म्हणाले, ‘आम्हा (भाजप) सर्वांना इतका आत्मविश्वास होता की आम्ही कधीच सत्तेत येणार नाही. त्यामुळे आम्हाला असे सांगण्यात आले की, तुम्ही बोला ना, सांगा ना (हवी ती आश्वासने द्या). तुमच्यावर कोठे जबाबदारी येणार आहे (सत्ता येणार).’पण त्यानंतर आमच्याकडे सत्ता आली. आता आम्ही सत्तेत आहोत आणि जनता आम्हाला विचारते तुम्ही तर बरेच काही बोलला होता. गडकरी, फडणवीस कोणत्या तारखेला काय बोलले हे लोकांना माहित आहे. आता लोक विचारतात त्या आश्वासनाचे काय झाले. त्यावर आम्ही हसतो आणि पुढे जातो, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचेही आश्वासन दिले होते. महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. काळा पैसा परदेशातून आणला जाईल, अशी अनेक मोठ-मोठी आश्वासने दिली होती. मात्र, यापैकी काहीही पूर्ण झालेले नाही, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे भाजपने केवळ आश्वासनच दिल्याची लोकांची भावना आहे.
तर काँग्रेसने गडकरींच्या या वक्तव्यावरुन भाजपला कोंडीत पडले आहे. काँग्रेसने देखील यावरून भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपने खोटी आश्वासने आणि जनतेची फसवणूक करुन सत्ता मिळवल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुका आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. त्यातच नितीन गडकरी यांचे वादग्रस्त विधान पुढे आल्याने विरोधी पक्ष भाजप सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गडकरी यांच्या या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत भाजपवर हल्लाबोल चढवलाय.