अमित शाह यांना स्वाइन फ्लूची लागण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. याची माहिती त्यांनीच ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. अमित शाह यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आज सकाळपासूनच बरे वाटत नव्हते. छातीमध्ये दुखत होते तसेच अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांनी एम्स रुग्णालयात तपासणीसाठी गेले. त्यावेळी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे लक्षात आले. त्यांना डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करुन घेतले.
दरम्यान, मला स्वाइन फ्लू झाला आहे. ईश्वराची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छांमुळे मी लवकर बरा होईन, असे अमित शाह यांनी टि्वट केले आहे. अमित शाह यांच्या आजारीची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा लखनऊहून दिल्लीला तात्काळ आलेत. त्यानंतर ते एम्स रुग्णालयात जाऊन शाह यांची भेट घेतली. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात अमित शाह आजारी पडले होते. आपला बंगळुरुचा दौरा अर्धवट सोडून त्यांना दिल्लीत परतावे लागले होते.
अमित शाह यांच्या छातीमध्ये दुखल्याने त्यांना रात्री साडेआठच्या सुमारास ते तपासणीसाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी चाचणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांना शाह यांना दाखल करुन घेतले आहे. त्यांना पुढचे दोन ते तीन दिवस डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे.