नवी दिल्ली : भाजपच्या काही नेत्यांकडून आणि काही खासदारांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपचे मित्र पक्ष दुखावले जात आहेत. याची दखल घेत पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच खडसावले आहे. गिरीराज यांनी एक ट्विट करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोला लगावला होता. त्यावरुन अमित शाह यांनी फोन करुन खडसावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह यांनी पक्षातील वादग्रस्त नेत्यांना स्पष्ट शब्दात बजावले आहे. वादग्रस्त विधाने करणे टाळावीत, असा सल्ला शाह यांनी दिला आहे. गिरिराज सिंह यांनी नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे इफ्तार पार्टीतील छायाचित्र ट्विट करीत त्यावर वादग्रस्त कमेंट केली होती. याची दखल घेत अमित शाह यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.


पाटणा येथील हज हाऊसमध्ये जेडीयूच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यावर टीका केली होती. त्यावर नितिश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले होते. गिरीराज सिंह केवळ प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करीत असतात, असे म्हटले होते.



गिरीराज सिंह यांनी ट्विट करीत म्हटले की, हे छायाचित्र किती सुंदर दिसले असते जेव्हा याच आवडीने नवरात्रोत्सवात त्यांनी फळांचे वाटप केले असते, आपल्या कर्मा आणि धर्माने आपण मागे का राहतो आणि दिखावा करण्यात पुढे असतो’ 



दरम्यान, गिरीराज यांच्या टिप्पणीवर जेडीयूचे प्रवक्ते संजय सिंह यांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपने त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी केली.