डाव्यांना दिला संबित पात्रांनी उजवा झटका, काय म्हणाले पाहा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी देशातील विरोधीपक्षातील नेत्यांची बैठक होत आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी देशातील विरोधीपक्षातील नेत्यांची बैठक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजिद मेमन आणि वंदना चौहान , माकपचे राज्यसभा खासदार विनय विश्वम हे देखील पवारांच्या घरी पोहोचले आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीचे शुशील गुप्ता, सपाचे घनश्याम तिवारी, आरएलडीचे जयंत चौधरी, सीपीएमचे नीलोत्पल वासु, ज्येष्ठ वकील केटीएस तुळशी, पत्रकार करण थापर, आशुतोष, के.सी सिंह हे देखील पोहोचले आहेत. शरद पवार आणि यशवंत सिन्हा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. टीएमसीचे उपाध्यक्ष आणि राष्ट्र मंचचे संस्थापक यशवंत सिन्हा हे देखील शरद पवार यांच्या घरी पोहोचले आहेत.
राष्ट्र मंचच्या बैठकीसंदर्भात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, 'ठगबंधनच्या बैठका तर होत असतात. बैठकीनंतरही हात धरुन उभे राहतात आणि नंतर स्वतंत्रपणे लढतात. त्यांच्यात नेतृत्व संघर्ष आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, कळत नाही की, लाईक माइंडेड काय असतं? या लोकांचं काय होईल हे दिसेलच.
शरद पवारांच्या बैठकीवर राहुल गांधी म्हणाले, मला स्वत: ला मुद्द्यांपासून दूर व्हायचे नाही, तसेच इतरांना ही विचलित करायचे नाही. राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत ज्या काही बैठका घेतल्या जातात, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्या विषयांवरही चर्चा केली जाईल.'
शिवसेना ही बैठकीपासून दूर आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पवार साहेब मोठे नेते आहेत आणि लोक त्यांच्याकडून राजकारण, अर्थव्यवस्था, इतर विषयांवर सल्ला घेतात पण माझा विश्वास नाही की ही बैठक विरोधी पक्षांची बैठक आहे कारण या बैठकीत सपा, बसपा, वायएसआरसीपी, टीडीपी, टीआरएस नाही.
राष्ट्र मंचाचे समन्वयक काय म्हणाले?
राष्ट्र मंच समन्वयक घनश्याम तिवारी म्हणाले, 'यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची प्रक्रिया सुरू केली होती आणि सध्याचे सरकार देशासाठी महत्त्वाच्या विषयांवर काम करत नाही. कारण त्याच्याकडे नेतृत्व नाही. देशासाठी चांगली विचारसरणी असलेले सर्व लोक नवीन विचार घेऊन एकत्र येत आहेत. आजची बैठक लोकांना सांगणे आवश्यक आहे की जर सरकार विचार करत नसेल तर व्हिजन संपलं असं होत नाही.'