नवी दिल्ली : राजकीय पक्षांचा खर्च पाहता एवढा पैसा कुठून येतो असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. परंतू राजकीय पक्षांना कॉर्पोरेट जगताकडून दरवर्षी करोडो रुपयांच्या देणग्या मिळतात. सर्व मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या पक्षांना राजकीय देणग्या देतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देणगी देणाऱ्या कॉर्पोरेट्समध्ये काही अज्ञात नावांचाही समावेश आहे.


राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणात पारदर्शकता ठेवण्यासाठी सक्रिय असलेल्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात राजकीय देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारती ग्रुप आणि ITC सारखी मोठी नावे आहेत.


भारती ग्रुप आघाडीवर


एडीआरच्या अहवालानुसार, 'भारती एंटरप्रायझेसद्वारे समर्थित प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट देणग्यांमध्ये आघाडीवर आहे. 2019-20 मध्ये राजकीय पक्षांना 247.75 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी हा ट्रस्ट 2016-17 आणि 2017-18 मध्येही देणग्या देण्यात आघाडीवर होता. या दोन वर्षांत, ट्रस्टने केवळ भाजप आणि काँग्रेस (INC) यांना 429.42 कोटी रुपयांची देणगी दिली होती.


आयटीसी लिमिटेड, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट(ITC Limited), बीजी शिर्के कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (BG Shirke Construction Pvt Ltd) आणि पंचशील कॉर्पोरेट पार्क प्रायव्हेट लिमिटेड (Panchsheel Corporate Park Pvt Ltd) या कंपन्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देणगीच्या बाबतीत आघाडीवर आहेत.


भाजपला 78 टक्के देणग्या


एडीआरच्या अहवालानुसार, भारतीय जनता पक्ष देणग्या मिळवण्यात आघाडीवर आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात टॉप-5 पक्षांना मिळून 921.95 कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट देणग्या मिळाल्या आणि त्यापैकी 720.40 कोटी रुपये एकट्या भाजपला मिळाले.


त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) आणि तृणमूल काँग्रेस (AITC) यांनाही देणग्या मिळाल्या आहेत. यावेळी सीपीआयला कोणतीही देणगी मिळालेली नाही. काँग्रेसला 133.04 कोटी आणि राष्ट्रवादीला 57.07 कोटी रुपये मिळाले आहेत.