`भाजपचे महाराष्ट्रात सत्तेसाठी निर्लज्ज प्रयत्न`; सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींची भाजपवर बोचरी टीका
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये भाजपने सत्तास्थापनेचे निर्लज्ज प्रयत्न केले, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते, पण ३ दिवसांमध्येच अजित पवारांचं बंड थंड झालं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे अखेर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या ट्विस्टनंतर आता महाविकासआघाडीचं सरकार येणार आहे. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधींना भेटून आमंत्रण दिलं होतं. पण कार्यक्रमाला जायचं का नाही, याबाबत अजून ठरवलं नसल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
महाविकासआघाडीकडून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची आणि तिन्ही पक्षांचे २ असे एकूण ७ जण शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत छगन भुजबळ शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेतील.