पणजी : गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आपली तिसरी आणि आपने चौथी यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. तर, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची उमेदवारी यादी उद्या ( बुधवारी ) जाहीर होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात भाजपच्या उमेदवारीवरून राजकारणाचे चित्र बदलले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल यांना भाजपने तिकीट नाकारले. त्यामुळे पर्रीकर समर्थक चार आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.


उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी शिवसेना आणि आप या दोघांमध्ये स्पर्धा रंगली आहे. भाजपची यादी अंतिम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे श्रीपाद नाईक, सतीश धोंड यांच्यासह आज दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये उमेदवारांची यादी संसदीय मंडळात अंतिम करून ती बुधवारी घोषित केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.


भाजपची पहिली यादी 25 उमेदवारांची?
भाजपने अद्याप आपली पहिली यादी जाहीर केली नाही. मात्र, दिल्लीमध्ये संसदीय मंडळात २५ उमेदवारांची यादी अंतिम करण्यात येणार आहे. हि यादी बुधवारी जाहीर केली जाणार आहे. मात्र, पणजीत उत्पल पर्रीकरांऐवजी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारीचे मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री सावंत यांनी दिले आहेत.


काँग्रेसची ( CONGRESS ) ९ जणांची तिसरी यादी जाहीर
काँग्रेसने आपली ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात मेघश्याम राऊत ( डिचोली ), अमन लोटलीकर ( थिवी ), मायकल लोबो ( कळंगुट ), विकास प्रभुदेसाई ( पर्वरी ), अँथनी फर्नांडिस ( सांत आंद्रे ), धर्मेश सगलानी ( साखळी ), लवू मामलेदार ( मडकई ), प्रसाद गावकर ( सांगे ) आणि जनार्दन भंडारी ( काणकोण ) यांचा समावेश आहे.


आपची ( AAP ) ५ जणांची चौथी यादी
आप पक्षानेही आपली चौथी यादी जाहीर केली आहे. ५ जणांच्या या यादीत लिंकन वाझ (मडगाव), नानू नाईक (प्रियोळ), गाब्रिएल फर्नांडिस (कुडचडे), राहुल परेरा (केपे) व मनोज आमोणकर (साखळी) यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुक 2022 साठी आप पक्ष सर्वात आधी पावले उचलताना दिसत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत 'टफ फाईट' पाहायला मिळणार आहे.