मोदींची बदनामी केलीत तर मार पडेल; भाजपाची मल्याळम साहित्यिकाला धमकी
पंतप्रधानांविषयी अशी भाषा वापरण्यावरुन आम्ही यापूर्वी त्यांना इशारा दिला होता.
कोची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मल्याळम साहित्यिक पॉल झचारिया यांना भाजपाकडून धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. पॉल झचारिया हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध लघुकथा आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकत्याच पलक्कड येथे झालेल्या कार्यक्रमातील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'खुनी' असा केला होता. यावरुन भाजपाचे स्थानिक नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपाचे प्रदेश सचिव बी. गोपालकृष्णन यांनी पॉल झचरिया यांना थेट धमकीच दिली. तुम्ही अशाचप्रकारे नरेंद्र मोदींची बदनामी करत राहिलात तर भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला मारतील, असे गोपालकृष्णन यांनी सांगितले. पंतप्रधानांविषयी अशी भाषा वापरण्यावरुन आम्ही यापूर्वी त्यांना इशारा दिला होता. मात्र, असेच सुरु राहिले तर त्यांना मार पडेल. झचरिया हे जातीयवादी लेखन करतात. मल्याळम साहित्याच्यादृष्टीने ते संकट आहेत, असे गोपाळकृष्णन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.