अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. राम मंदिर उभं राहण्यासाठी लढा देणारे लालकृष्ण अडवाणी यांनी आपण हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यादरम्यान आता लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेवर लालकृष्ण अडवाणी म्हणाले आहेत की, "अयोध्येत राम मंदिर होणार हे नियतीने आधीच ठरवलं होतं". लालकृष्ण अडवाणी यांनी हा क्षण आणण्यासाठी, रामलल्लाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी आणि त्यांचा संकल्प पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 


‘श्रीराममंदिर: एक स्वप्नपूर्ती’


वैचारिक विषयांवरील मासिकाशी संवाद साधताना लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'श्री राम मंदिर : एक दिव्य स्वप्नाची पूर्तता' या लेखात त्यांनी या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. हा विशेषांक 15 जानेवारीला प्रकाशित होत आहे. आपल्या रथयात्रेतील अविस्मरणीय क्षणांचं स्मरण करत अडवाणी म्हणाले की, रथयात्रेला आज जवळपास 33 वर्षं झाली आहेत. 25 सप्टेंबर 1990 रोजी सकाळी रथयात्रेला सुरुवात करताना आम्हाला माहिती नव्हतं की, प्रभू श्रीरामावरील ज्या आस्थेपासून प्रेरित होत आम्ही जी यात्रा सुरु करत आहोत ती एके दिवशी आंदोलनाचं रुप घेईल. 


श्री रामलल्लाचे मंदिर उभारण्याचा ठाम संकल्प घेऊन 33 वर्षांपूर्वी देशातील 10 राज्यांमध्ये रथयात्रा काढणारे भाजपाचे माजी अध्यक्ष आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या 10 हजार किलोमीटरच्या प्रवासात अडवाणींचे सर्वात विश्वासू सहकारी होते हादेखील एक योगायोगच आहे .आता ते मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार होतील. अयोध्येतील राम मंदिराचा संकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. अडवाणींच्या रथयात्रेने संपूर्ण देशातील रामभक्तांची श्रद्धा जागृत करण्याचे काम केलं होतं.


लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारीला राहणार हजर


विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या  कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची पुष्टी केली आहे. अडवाणींच्या अयोध्या दौऱ्यात त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्था पुरवल्या जातील, असंही सांगण्यात आलं आहे. आलो कुमार यांनी आरएसएसचे नेते कृष्ण गोपाल यांच्यासह अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं.