कोलकाता: भाजपचे सरकार देशातील सगळ्या गोष्टी विकून टाकेल. एक वेळ अशी येईल की, देशात केवळ तुरुंग आणि छावण्याच (डिटेन्शन कॅम्प) उरतील, अशी जळजळीत टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. त्या बुधवारी नादिया येथील कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकारने नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावेळी एलआयसी मधील हिस्सा विकणार असल्याचे जाहीर केले. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासगी रेल्वेसेवा सुरु करण्याचेही संकेत दिले होते. तत्पूर्वी सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी निवीदाही मागवल्या होत्या. 


दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी


या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार एलआयसी आणि एअर इंडियाचे खासगीकरण करणार आहे. रेल्वेचेही खासगीकरण करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे आपला पैसा सुरक्षित राहिलेला नाही. भाजप सरकार देशातील सगळया गोष्टी विकून टाकेल. त्यानंतर देशात फक्त तुरुंग आणि डिटेन्शन कॅम्पच उरतील, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.  



तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे भाकीतही ममता बॅनर्जी यांनी वर्तविले. भाजप एक एक करून राज्य गमावत आहे. मात्र, ते निर्लज्ज आहेत, असेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटले. 


शाहीन बागेत शुभा मुद्गल यांच्या शास्त्रीय संगीताची मैफल; व्हीडिओ व्हायरल


यावेळी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय नागरिक सूची (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NPR) याबद्दल केंद्राच्या बदलत्या भूमिकांवरही टीकास्त्र सोडले. देशात NRC येणार नाही, असे सरकारने लोकसभेत सांगितले. मात्र, NPR हीच NRC पूर्वीची पायरी असेल तर आम्ही त्यासाठी तयार का व्हावे, असा सवालही यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.