दिल्लीत भाजपाच्या महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. वर्षा असं या महिला कार्यकर्त्याचं नाव असून ती 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. दिल्लीमधीलच एका प्लेस्कूलमध्ये तिचा मृतदेह सापडला असून यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय वर्षा नरेला येथील स्वतंत्र नगर भागात वास्तव्यास होती. तिचे वडील विजय कुमार यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा 23 फेब्रुवारीला स्कुटी घेऊन घराबाहेर पडली होती. अखेरची ती आपला व्यावसायिक भागीदार सोहन लालसोबत दिसली होती. विजय कुमार यांनी सांगितलं की, वर्षाने सोहनसोबत घोंडा रोड येथे टायनी ड्रीम बेरी प्लेस्कूल सुरू केलं होतं. हे प्लेस्कूल अजून सुरु झालेलं नाही.


विजय कुमार यांनी सांगितलं आहे की, त्यांनी 24 फेब्रुवारीला वर्षाला फोन केला होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने हा फोन कॉल घेतला होता. आपलं नाव हर्षना असून हा फोन रेल्वे ट्रॅकवर सापडल्याचा दावा त्या व्यक्तीने केला होता. तसंच एक व्यक्ती ट्रॅकवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने सांगितलं होतं. 


त्या व्यक्तीने विजय कुमार यांनी व्हिडीओ कॉलही केला होता. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख सोहन म्हणून केली होती. पण जेव्हा विजय कुमार हर्षनाकडे पोहोचला तेव्हा त्याला सोहन सापडला नाही.


पोलिसांनी प्लेस्कूलमध्ये शोध घेतला असता त्यांना काहीच सापडला नाही. पण तळमजला बंद असल्याने ते आतमध्ये जाऊ शकत नव्हते. यानंतर पोलिसांनी मोबाईल फोन ट्रॅक करत सोहनचं शेवटचं लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सोहन किंवा वर्षा कोणीही सापडलं नाही. 


अखेर हतबल झालेल्या विजय कुमार यांनी बुधवारी प्लेस्कूल गाठलं आणि मालकाला शाळेचं शटर उघडण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी मेन डेस्कच्या मागे वर्षाचा मृतदेह आढळला. त्यांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तिचा दुपट्टा गळ्याभोवती गुंडाळलेला होता. यामुळे प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आहे. 


यादरम्यान दुसरीकडे पोलीस सोहनचा शोध घेत होते. 25 फेब्रुवारीला जीआरपीला रेल्वे ट्रॅकवर एक अज्ञात मृतदेह आढळला. पोलिसांना हा मृतदेह सोहन लालचा असावा अशी शंका आहे. वर्षाची हत्या केल्यानंतर सोहनने आत्महत्या केली असा संशय आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं.