श्रीनगर : भाजपचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे, अशी माहिती पीडीपी नेत्या आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलेय. ज्या पद्धतीने हे घडलं ते आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारे होते. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती न देता भाजपने हा निर्णय घेतला आहे, असे त्या म्हणाल्या. भारतीय राज्य घटनेने ३७० कलम आम्हाला दिलेले आहे. याबाबत तडजोड करणे शक्य नाही. आम्ही पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करत होतो. जेणेकरुन येथे शांतता स्थापन होण्यास मदत होईल, असे मुफ्ती म्हणाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपीचा पाठिंबा काढून भाजपने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप केला. भाजपच्या या निर्णयाचा पीडीपीलाही धक्का बसला आहे. भाजपच्या साथीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत सरकार चालवले. पण ज्या पद्धतीने हे घडलं ते आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारे होते. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती न देता त्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी माध्यमांसमोर दिली.  


दरम्यान, केंद्र सरकारने पूर्ण मदत करूनही राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले. काश्मीर खोऱ्यातील स्थिती वाईट होत गेली. आता राष्ट्रीय सुरक्षा आणि एकता लक्षात घेत आम्ही या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे नेते राम माधव यांनी म्हटले आहे.



जम्मू-काश्मीरमधील जनतेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपने पीडीपीसोबत सरकार चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सद्यस्थितीत सरकारमध्ये राहणे अवघड झाले होते. राज्यात दहशतवाद वाढला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सहमती दर्शवल्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे माधव यांनी यावेळी स्पष्ट केले.