पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. जास्त जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्याने काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, भाजपने काँग्रेसचे दोन आमदार गळाला लावून काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न अधुरे ठेवले. मात्र, भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असताना आता पक्षात बंडाचे संकेत मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री यांनी बंडाचा इशारा दिलाय. त्यामुळे भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातील घडामोडींवर भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांचे  नाराज झाले आहेत. पक्षासाठी घाम गाळलेल्यांचा नेत्यांनी घात केला गेला आहे, असा थेट आरोप केला आहे. भाजप काँग्रेसला एक-एक मतदारसंघ देत चालला आहे. त्यामुळे भाजपला याचा फटका बसणार आहे, असे रोखठोक मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या मुलाखतीत व्यक्त केले.


गोवा भाजप देशापुढे चुकीचं उदाहरण ठेवत आहे, असा घणाघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय. भाजपमध्ये केडरला किंमत राहिलेली नाही. मला निवडणुकीत स्वकीयांनी पाडण्याचे दुष्कृत्य केले आहे. मला कल्पना न देता दयानंद सोपटेना पक्षात घेतलं. भाजपने अपेक्षाभंग केलाय, असा हल्लाबोल लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय.


मी भाजी आधी मीठ खाणार नाही. भाजीत मीठ खाईन. मी पोटनिवडणूक लढवावी कि नाही हे जनतेने ठरवावं. मला निवडणुकीत पाडण्याचे काम करणारा पडद्यापुढचा आणि मागचा कलाकार कोण हे संपूर्ण गोमांतकीयांना ठाऊक आहे. विरोधी पक्षाच्या माणसांना पक्षात घेत असल्याने जनमानसात पक्षाची प्रतिमा खालावली आहे, असे मत लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी व्यक्त केले.