नवी दिल्ली : आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. तसंच भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. याशिवाय भाजपनं आपल्या सर्व खासदारांची सोमवार आणि मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या खासदारांना राष्ट्रपतीपद निवडणुक प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. 


राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडीत प्रस्तावक आणि अनुमोदक यांच्यात आमदारांचाही समावेश असतो. या संदर्भातील सगळ्या प्रक्रिया २० जूनला पार पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार २० किंवा २१ जूनला जाहीर होण्याची शक्यता असून हा उमेदवार 23 जूनला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जूनला अमेरिकेला रवाना होण्याआधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं बोललं जातं आहे. उमेदवार निश्चितीसाठी भाजपने ६० प्रस्तावक आणि ६० अनुमोदक यांचे प्रत्येकी चार गट तयार केल्याची माहितीही मिळते आहे.