ब्लँकेट महिन्यातून एकदा नाही तर...; रेल्वे मंत्र्यांना प्रशासनाने तोंडघशी पाडले! खरंच किती वेळा धुतात रेल्वेतील ब्लँकेट?
Indian Railway: भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा रेल्वेतील एसी कोचच्या ब्लँकेटच्या स्वच्छतेवरुन माहिती देण्यात आली आहे. मात्र तरीदेखील प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे म्हटलं आहे.
Indian Railway: गेल्या काही दिवसांपासून भारतीय रेल्वेमधील स्वच्छतेवरुन मोठा वादंग उठला आहे. रेल्वेतील बेडशीट आणि ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतल्या जातात, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली होती. त्यानंतर ट्रेनमधील स्वच्छतेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. एका महिन्यातून जवळपास 30 प्रवासी एकच ब्लँकेट वापरतात, असा रोख प्रवाशांचा होता. मात्र, आता या सगळ्या प्रकरणांवर रेल्वेकडून उत्तर देण्यात आलं आहे.
भारतीय रेल्वेच्या एसी कोचमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेटच्या स्वच्छतेबाबत काँग्रेसचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी प्रश्न उपस्थित केले होते. रेल्वेतील बेंडिगची मुलभूत स्वच्छता कशी केली जाते? रेल्वे महिन्यातून फक्त एकदाच ब्लँकेट धुतले जाते? पण प्रवाशांच्या तिकिटातून या ब्लँकेट धुण्याचे पैसे घेतले जातात, असा प्रश्न इंदौरा यांनी केला होता. त्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिखित स्वरुपात उत्तर देत म्हटलं होतं की, प्रवाशांना देण्यात येणारं ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतलं जातं. रेल्वेमंत्र्यांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर रेल्वेतील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीकेनंतर भारतीय रेल्वेने उत्तर दिलं आहे. 2016 पासूनच रेल्वेत देण्यात येणाऱ्या ब्लँकेटची स्वच्छता महिन्यात दोनदा केली जात आहे. उत्तर रेल्वेकडून हा दावा करण्यात आला आहे की, ब्लँकेटची स्वच्छता महिन्यात दोनदा केली जाते. मात्र तरीदेखील या वर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. 15 दिवसांतून ब्लँकेटची स्वच्छता केली जाते याचा अर्थ 15 लोकांनी तेच ब्लँकेट वापरले आहे. यावर उत्तर रेल्वेने दावा केला आहे की, रेल्वेच्या एका ट्रिपनंतर यूव्ही सेनेटाइजेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवाशांना सोयीचे होईल अशा लांब चादरी आणि ब्लँकेट देण्यात येतात. तसंच, खाण्या-पिण्याचे पदार्थही पुरवण्यात येतात. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेनिनची सफाई दररोज केली जाते. मॅकेनिकल लाँड्रीमध्ये ही सफाई केली जाते तसंच, प्रशासनाचे लक्षदेखील असते. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावलेले असतात. त्याव्यतिरिक्त अधिकारी आणि पर्यवेक्षकांकडून नेहमी परीक्षणदेखील केले जाते.
रेल्वेमंत्र्यांनी काय म्हटलं होतं?
रेल्वेकडून दिले जाणारे ब्लँकेट्स हे हलके आणि सहज धुता येणारे असतात. तसंच, प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभवदेखील मिळतो. स्वच्छ होऊन आलेल्या वस्तुंची गुणवत्ता तपासण्यासाठी व्हाइट मीटरचा उपयोग केला जातो. स्वच्छ बिछाना उपलब्ध करण्यासाठी मॅकेनाईज्ड लॉन्ड्रीचा वापर केला जातो, असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, सुती कपडे धुण्यासाठी मानकीकृत मशिन्स आणि केमिकलचा वापर केला जातो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.