मुंबई : ब्लू टूथ हेडफोनचा वापर करत गाणी ऐकताय किंवा कॉलवर बोलताय? मग ही बातमी वाचून सावधान व्हा...कारण ब्लू-टूथ हेडफोनचा वापर करणं एका 28 वर्षीय मुलाच्या थेट जीवावर बेतलं आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, हे ब्लू टूथ हेडफोन चार्जिंगला लावले असता त्यांचा स्फोट झाला. यामुळेच या तरूणाला जीव गमवावा लागला. 


पोलिसांनी शनिवारी सांगितले की, अपघातात बळी पडलेला 28 वर्षीय तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. चौमु शहरातील उदयपुरिया गावात हा अपघात झाला. राकेश कुमार नगर घरात ब्लू टूथ हेडफोन लावून बसला होता आणि त्याला चार्जिंग प्लगशी देखील त्याने जोडलं होतं.


गोविंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक हेडफोनचा स्फोट झाला आणि तो तरुण बेशुद्ध झाला. या घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


सिद्धिविनायक रुग्णालयाचे डॉ.एल.एन.रुंडला म्हणाले की, तरुणाला बेशुद्ध अवस्थेत रूग्णालयात आणण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा युवक कदाचित हृदयाविकाराच्या झटक्याने मरण पावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेशचे लग्न याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झालं होतं.