मदरशात स्फोट; झोपलेल्या अवस्थेतील १२ विद्यार्थी आगीत जखमी
इस्लामिया अशरफ उल मदारिस यांच्या मदरशात रात्री झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर धुरानं भरला होता
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात गुरुवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एकच गोंधळ उडाला. मदरशातील एका बंद खोलीतून मोठे स्फोटाचे आवाज झाले आणि मदरसा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा मदरशातील त्या खोलीत काही विद्यार्थी झोपले होते. या स्फोटात जवळपास १२ विद्यार्थी जखमी झालेत. त्यातील १० विद्यार्थ्यांना उपचारासाठी मेरठच्या रुग्णालयात धाडण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही रुग्णालयात दाखल झालेत.
सुजडू गावात हा मदरसा आहे. इस्लामिया अशरफ उल मदारिस यांच्या मदरशात रात्री झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर धुरानं भरला होता... आणि एकच गोंधळ उडाला. फ्रिजचा कम्प्रेशर फुटल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
स्फोटाचे आवाज ऐकल्यानंतर आजुबाजुचे रहिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना आगीतून बाहेर काढलं. जखमी विद्यार्थ्यांमध्ये १० मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. या मुलांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.