नवी दिल्ली: पाकिस्ताने स्वत:च्या हवाई हद्दीतून प्रवास करायला भारतीय विमानांना बंदी केली तर आपण त्यांचा समुद्री मार्ग रोखायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना सरकारला दिला आहे. त्यासाठी भारताने अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणारा मार्ग रोखला पाहिजे, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून नजीकच्या काळात भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी स्वत:ची हवाई हद्द बंद केली जाण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, नमो सरकारला मी एक सल्ला देऊ इच्छितो. पाकिस्तानने आपल्या व्यवसायिक आणि नागरी विमानांसाठी हवाई हद्द बंद केली तर आपण अरबी समुद्रातील कराचीकडे जाणारा मार्ग रोखून धरला पाहिजे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले. 


काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी यांनी भारतासाठी पाकिस्तानची हवाई हद्द पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात असल्याचे वक्तव्य केले होते. भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी पाकिस्तानी रस्त्यांचा वापर केला जातो. त्या वापरावरही बंदी घालण्याचा विचारही पाकिस्तानकडून सुरु आहे.


यापूर्वी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यावेळीही भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.