ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : भारतीय नौदलाची ताकद कमालीची वाढतेय. महासागरांमध्ये कारवाया फत्ते करणाऱ्या भारतीय नौदलावर ब्लू वॉटर नेव्हीचा शिक्का अधिक दृढ होणार आहे. जेव्हा ताकद अद्वितीय असेल, जेव्हा ताकद अजेय बनवेल, जेव्हा महासागरांवर तुमचाच दबदबा असेल, जेव्हा जगातलं प्रत्येक अत्याधुनिक हत्यार तुमच्याकडे असेल, तेव्हा ब्लू वॉटर नेव्हीचा दर्जा मिळतो. म्हणजेच समुद्रावरही सिकंदर आणि समुद्राच्या तळातही अजिंक्यच असतो. जगातल्या चारही महासागरांमध्ये तुमचाच दबदबा असतो, त्याला ब्लू वॉटर नेव्ही असं म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय नौदल आता सातत्याने स्वदेशी युद्धनौकांना आपल्या जंगी ताफ्यात सामील करत आहे. भारताने नुकतंच या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललं. कोलकाता स्थित गार्डन रिच शिपयार्ड इंजिनिअर्स म्हणजे जीआरएसईमध्ये (GRSEM) पहिली फ्रिगेट समुद्रात लाँच केलीय. 


भारतीय नौदलाच्या तब्बल ४१ नव्या युद्धनौका देशातल्या विविध शिपयार्डमध्ये तयार होत आहेत. नौदलाच्या ताफ्यात सध्या १५० छोट्या मोठ्या युद्धनौका आहेत. प्रोजेक्ट १७ ए अंतर्गत देशात आणखी ७ फ्रिगेट तयार होतील. 



अवाढव्य हिंदी महासागराच्या सुरक्षेसाठी भारताच्या ताफ्यात मोठ्या संख्येने युद्धनौका आवश्यक आहेत. पंतप्रधान मोदींनी नुकताच प्लॅन सागर म्हणजेच सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन जाहीर केला. या अंतर्गत हिंदी महासागरासाठी भारत नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर असेल. याचसोबत इंडियन ओशियन रिजनच्या सर्व देशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी भारताकडे असेल.


त्यामुळे भारत कमालीच्या वेगाने आपल्या ताफ्यात वाढ करत आहे. भारताला आता तिसऱ्या एअरक्राफ्ट कॅरियरची आवश्यकता आहे. सध्या भारताच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य ही एअरक्राफ्ट कॅरियर कार्यरत आहे. कोचिन शिपयार्डमध्ये स्वदेशी बनावटीची विक्रांत क्लास एअरक्राफ्ट कॅरियर तयार होतेय. 


मात्र हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी भारताला आणखी एका एअरक्राफ्ट कॅरियरची गरज आहे. याशिवाय भारत अणुपाणबुडीवरही काम करत आहे. मलबार युद्धसराव जोरात केला जातोय. आकाशातून चिनी पाणबुड्यांचा मागोवा घेणारी पी८ आय ही विमानं असो की पाणबुड्यांना जलसमाधी देणारी रोमिओ हेलिकॉप्टर्स... भारतीय नौदलाची सातत्याने प्रगती सुरू आहे. चीन आणि पाकिस्तानचा धडकी भरवणारीच ही प्रगती आहे.