नवी दिल्ली : लहान मुलांना - तरुणांना आत्महत्येसाठी उद्युक्त करणाऱ्या धोकादायक अशा 'ब्लू व्हेल चॅलेंज' या गेमवर सरकारनं बंदी जाहीर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात या गेममुळे दोन तरुणांनी याआधीच आपला जीव गमावलाय. मुंबईत राहणाऱ्या १४ वर्षीय मनप्रीत आणि पश्चिम बंगालच्या दहावीत शिकणाऱ्या अनकन डे या दोन मुलांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. मध्यप्रदेशातही एका तरुणानं हा गेम खेळल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 


केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी या गेमवर बंदी आणण्याची मागणी सरकारकडे केली होती. या संदर्भात केंद्रीय सूचना आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं यासंबंधी आदेश जारी केलेत.


ब्लू व्हेल चॅलेंज आणि यांसारख्या धोकादायक गेम्सना सर्व सोशळ मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश मंत्रालयानं दिलेत. हा गेम सुरू ठेवणाऱ्यांसंबंधात पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात यावी, असंही आदेशात म्हटलं गेलंय.


तांत्रिकदृष्ट्या शक्य?


सरकारनं असे आदेश दिले असले तर ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम मोबाईल अॅप नाही... त्याला डाऊनलोड किंवा सबस्क्राईब करता येत नाही. यामध्ये क्युरेटर प्लेअरला ५० टास्क देतो, त्यात शेवटचा टास्क आत्महत्येचा असतो. या चॅलेंजसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप किंवा स्नॅपचॅटचा वापर होतो. क्युरेटर यापैंकी कोणत्याही सोशल मीडियाचा वापर करत प्लेअरशी संपर्क साधतो. 


क्युरेटरकडे प्लेअरची गुप्त माहिती आणि नंबर असतो. त्याद्वारे ते प्लेअरला ब्लॅकमेल करतात. क्युरेटर आणि अॅडमिन प्लेअरला टास्क देताना मास्क घालून असतात. त्यामुळे इंटरनेटवरून त्यांची ओळख पटवणं शक्य नाही. त्यामुळे सरकार या गेमच्या क्युरेटर आणि अॅडमिनपर्यंत कसं पोहचणार हा प्रश्न आहे.