मुंबई : एकेकाळी डबघाईला चाललेली, कर्मचारी संप- आंदोलनांमुळे, पगाराच्या थकबाकीमुळे चर्चेत असणाऱ्या एअर इंडियाला आता नवसंजीवनी मिळाली आहे. टाटा समुहाकडेच एअर इंडियाची (Air India) घरवापसी झाली आणि हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 69 वर्षांनी टाटा समुहाच्या हाती एअर इंडियाची सूत्र आली, साऱ्या देशानं आता या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून फार अपेक्षा ठेवल्या आहेत. 


मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये एअर इंडियाचा हिरमुसलेला महाराजा आता पुन्हा एकदा आनंदानं सगळ्यांचं स्वागत करत आहे. 


कित्येक वर्षे उलटली, 1938 मध्ये (Tata Air)टाटा एअर ही कंपनी सुरु झाली. त्याच वर्षी बॉबी कुका यांनी कंपनीच्या मार्केटिंक विभागात कामाची सूत्र हाती घेतली. 


तेव्हाच कुका यांच्या डोक्यात महाराजाची कल्पना आली. थोडक्यात हा महाराजा चांगलाच वयोवृद्ध तरीही तितकाच तरुणही आहे. 


एअर इंडियाचं नव्यानं नामकरण होत असताना महाराजाची (Maharaja)संकल्पना अंमलात आणली गेली आणि तेव्हापासून बऱ्याच जाहिरातींमध्ये हा महाराजा एअर इंडियाचा चेहरा झाला. 


कुका यांच्या डोक्यात महाराजा कसा असावा याचं चित्र आधीच रेखाटलं गेलं होतं. 'एका चांगल्या संक्षिप्त स्पष्टीकरणासाठी आम्ही त्याला महाराजा म्हणतो. पण, त्याचं रक्त निळं नाही. तो राजेशाही दिसत असावा पण तो राजघराण्यातील नाही', ही ती व्याख्या. 


तुम्हाला कल्पनाही नसावी, पण या महाराजाच्या मिश्या पाकिस्तानमधील उद्योजक सय्यद वाजिद अली यांच्यापासून प्रेरणा घेत साकारण्यात आल्या होत्या. 


वाजिद साहेबांचं व्यक्तिमत्त्वं आणि त्यांची जीनशैली याचा कुका यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला होता. 



जे वॉल्टर थॉम्पसनच्या उमेश राव यांच्यासोबत मिळून कुका यांनी एअर इंडियाच्या या चिन्हासाठी बरीच मेहनत घेतली. 1946 मध्ये सर्वात पहिल्यांदा हा महाराजा कल्पनेतून संपूर्ण जगासमोर आला होता. 


तेव्हापासून आजपर्यंत महाराजाची अनेक रंग, रूपं समोर आली. अविरत सेवा देणाऱ्या या कंपनीचे अनेक कर्मचारी इतक्या वर्षांत बदलले. पण, हा महाराजा मात्र आपल्या स्वागतासाठी तेव्हाही होता आणि आजही आहे. 


नव्यानं कंपनी उभी राहताना अनुभवाचं कुणीतरी असावं म्हणून आता हा महाराजाच असेल, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.