तिरुपती मंदिराजवळ सापडला बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह; सुरक्षा यंत्रणेत मोठी वाढ
Tirupati Temple : तिरुपती मंदिर परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यानंतर मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या ताब्यात सोपवला आहे.
Tirupati Temple : देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती मंदिर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तिरुपती मंदिरात जाण्याच्या मार्गावर बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (TTD) शुक्रवारी संध्याकाळी बेपत्ता झालेली सहा वर्षांची मुलगी शनिवारी दुपारी मृतावस्थेत आढळल्यानंतर सुरक्षा वाढवली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानमने आता सुरक्षेसाठी तिरुमला येथील मंदिराकडे जाणाऱ्या अलीपिरी पायऱ्यांवर पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
बिबट्याने 6 वर्षाच्या मुलीला ठार मारून खाल्ल्याचे समोर आले आहे. मंदिरात दर्शनासाठी पायी जात असताना बिबट्याने तरुणीवर हल्ला केला. बिबट्याने अचानक मुलीवर झेप घेत तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या शरीराचा अर्धा भाग खाऊन टाकला. ही घटना समोर आल्यानंतर मंदिरात जाणारे सर्व भाविक घाबरले आहेत. त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. अनेक भावी हे पायी तिरुपती मंदिरात जात असतात. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने तिथे हिंस्र श्वापदे देखील आहेत. त्यातच बिबट्याने मुलीवर हल्ला करुन तिला ठार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
टीटीडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 6 वर्षांची मुलगी तिच्या आई-वडिलांपासून आणि नातेवाईकांसह मंदिराकडे हरवली होती. रस्ता चुकल्यामुळे ती आजूबाजूच्या जंगलात भटकत होती. रात्र झाल्यानंतर वन्य प्राण्यांनी तिच्यावर हल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळी आठच्या सुमारास अलीपिरी पायी मार्गावरून डोंगर चढण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती कुटुंबियांपासून वेगळी झाली. रात्री 11 च्या सुमारास अचानक बिबट्याने 6 वर्षीय मुलीवर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याने मुलीला ओढत जंगलात नेले.
शनिवारी सकाळी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. बिबट्याने मुलीच्या शरीराचा जवळपास अर्धा भाग खाल्ला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर मंदिरात दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान, यापूर्वीही 21 जून रोजी फुटपाथ मार्गावर एका तीन वर्षाच्या मुलावर एका जनावराने हल्ला केला होता. मात्र त्या हल्ल्यात तो बचावला होता. वनविभागाने हा हल्ला बिबट्याने केला असावा असे म्हटलं होतं. त्यानंतर टीटीडी कार्यकारी अधिकारी ए व्ही धर्मा रेड्डी यांनी टीटीडी दक्षता आणि सुरक्षा पथक, पोलिस आणि वन विभागाच्या अधिकार्यांसह या प्रकरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली होती.