धक्कादायक ! रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षातून नेला कोरोना रुग्णाचा मृतदेह
रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला.
हैदराबाद : देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णांची अनेक हृदयद्रावक छायाचित्रे समोर आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आता आणखी एक चित्र समोर आले आहे. हे चित्र तेलंगणातील आहे. तेलंगणाच्या निजामाबाद शहरात कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटो रिक्षाने स्मशानभूमीत नेण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखेविनाच नेण्यात आला.
खरं तर, रुग्णालयाने 50 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना स्वाधीन केला. रुग्णालयाने मृतांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका सुविधा देखील पुरविली नाही. एएनआयशी बोलताना निजामाबाद शासकीय रुग्णालयातील नागेश्वर राव म्हणाले, "मृत व्यक्तीचे कुटुंब रुग्णालयातच काम करतात आणि त्यांच्या सांगण्यानुसार मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला."
राव पुढे म्हणाले की, 'मृत व्यक्तीच्या कुटुंबाने एका युवकाच्या मदतीने मृतदेह ऑटो रिक्षात नेला. दुसरा तरुण आमच्याच हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. नागेश्वर राव पुढे म्हणाले की, '50 वर्षीय रूग्णाला 27 जून रोजी निजामाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते कोविड पॉझिटिव्ह होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.'