कतारच्या जेलमध्ये अडकलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. कतारच्या कोर्टाने हेरगिरी प्रकरणी या अधिकाऱ्यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्याचं जन्मठेपेत रुपांत करण्यात आलं होतं. दरम्यान कतारने सुटका केल्यानंतर 7 अधिकारी मायदेशी परतले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींच्या मध्यस्थीशिवाय आमची सुटका शक्य नव्हती अशी भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पण यादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रहमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शाहरुख खानने (Shahrukh Khan) केलेल्या मध्यस्थीमुळे कतारने (Qatar) 8 नौदल अधिकाऱ्यांची (naval officers) सुटका केली असा दावा सुब्रहमण्यम स्वामी यांनी केला आहे. परराष्ट्र खातं आणि अजित डोवाल मध्यस्थी करण्यात अपयशी ठरले अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. 


सुब्रहमण्यम स्वामी नेमकं काय म्हणाले आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती आणि कतार दौऱ्यावर जाणार असल्याचं ट्विट केलं होतं. यामधून दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. यावर सुब्रहमण्यम स्वामी यांनी शाहरुख खानला सोबत घेऊन जाण्याचा सल्ला दिला. 


"कतारच्या शेखांचे मन वळवण्यात परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले असताना नरेंद्र मोदींनी शाहरुख खानला आपल्यासोबत कतारला घेऊन जावं.  नरेंद्र मोदींनी शाहरुख खानकडे मध्यस्थीसाठी विनंती केली होती. यामुळे आपल्या नौदल अधिकाऱ्यांची सुटका करुन घेण्यासाठी कतारच्या शेखांकडून महागडा तोडगा स्विकारावा लागला आहे," असा दावा सुब्रहमण्यम स्वामी यांनी केला आहे.



शाहरुखच्या टीमने मात्र दिला नकार


नौदल अधिकारी पुन्हा भारतात परतण्यात शाहरुख खानचा हात असल्याचा सुब्रहमण्यम स्वामी यांचा दावा असला तरी शाहरुखने मात्र नकार दिला आहे. शाहरुख खानच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. सर्व देशवासियांप्राणे तोदेखील नौदल अधिकारी मायदेशी परतल्याने आनंदी आहे असं टीमने सांगितलं आहे. 


शाहरुखच्या टीमने इंस्टाग्रामवर अधिकृत निवेदन जारी केलं आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की, "कतारमधील नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेत शाहरुखचा हात असल्याचं बोललं जात आहे. पण त्याचा यामध्ये कोणताही हात नसल्याचं आम्ही स्पष्ट करु इच्छित आहोत. ही सुटका फक्त भारत सरकारमुळे झाली आहे. शाहरुख खानचा याच्याशी काही संबंध नाही. तसंच राजकीय मुत्सद्देगिरीसाठी आपले नेते सक्षम आहेत. इतर भारतीयांप्रमाणे शाहरुख खानही अधिकाऱ्यांच्या सुटकेमुळे आनंदी आहे". 



शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने इंस्टाग्रामला हे निवेदन शेअर केलं आहे. यामध्ये तिने शाहरुखचं अधिकृत विधान असा उल्लेख केला आहे.