`ह्युमन ट्राफिकिंग`च्या विळख्यात अडकलेल्या महिलेच्या मदतीला सनी देओल
दलालाकडून विकल्या गेलेल्या महिलेला....
मुंबई : अभिनयाकडून राजडकारणाकडे वळलेल्या आणि गुरदासपूरच्या खासदारपदी असणाऱ्या सनी देओल यांची सध्या बरीच प्रशंसा होत आहे. सनीची प्रशंसा होण्यास कारण आहे, त्याने केलेलं एक महत्त्वाचं काम. कुवेतमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीकडे विकल्या गेलेल्या ४५ वर्षीय भारतीय महिलेला त्या जाळातून मोकळं करत तिला मायदेशी, तिच्या स्वत:च्या घरी परत आणण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यश आलं आहे.
वीणा बेदी नामक या महिलेला एका पाकिस्तानी इसमाला विकण्यात आलं होतं. ट्रॅव्हल एजंट अर्थात दलालाकडून ही प्रक्रिया पार पडली होती. परदेशात घरकामाची, महिना ३० हजार रुपये पगाराची नोकरी देतो, असं सांगत तिची फसवणूक करण्यात आली होती. त्या ठिकाणी तिला मारहाणही केली जात होती. इतकच नव्हे, तर बंदीही ठेवण्यात आलं होतं.
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांकडून ज्यावेळी सनी देओल यांना या प्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी यात लक्ष घातलं आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सहाय्याने बेदी यांना मायदेशी परत आणण्याची जबाबदारी पार पाडली. शुक्रवारी बेदी त्यांच्या घरी परतल्या.
बेदी यांना परत आणण्यासाठी देओल यांना दोन स्वयंसेवी संस्थांची मदत झाली. ज्यामध्ये कुवेत आणि कॅऩडास्थित स्वयंसेवी संस्थांचा समावेश होता. या यशानंतर सनी देओल यांच्या पाठीवर अनेकांनीच कौतुकाची थाप दिली. सनी यांचे वडील, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं कौतुक केलं.
सनी देओल यांचे हे प्रयत्न पाहता गुरदासपूर मतदार संघात ते अगदी योग्य दिशेने काम करत असण्याची प्रतिक्रिया भाजपच्या विपिन महाजन यांनी दिली. गेल्या बऱ्याच काळापासून देओल या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवर शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्यालाच प्राधान्य देत आहेत.