मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवड़णुकीत मिळालेल्य़ा घवघवीत यशानंतर आता त्यांच्यावर फक्त राजकीय वर्तुळातूनच नव्हे तर, कलाविश्वातूनही त्यांच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. एकिकडे दक्षिणेकडील काही राज्य वगळता जवळपास देशभराच भाजपला घवघवीत यश मिळालं, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच विजयाचं औचित्य साधत चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या विवेक ओबेरॉयने विरोधी पक्षनेत्यांना एक सल्ला दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचा भारत देश बदलला असून, तुम्ही केलेलं कामच सर्वकाही सांगून जातं, असं सूचक विधान त्याने केलं. इथे तुमच्या वडिलांचं नाव चालत नाही, तर तुमचं कामच सर्वकाही सांगून जातं', असं विवेक म्हणाला. 


चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याला विरोध करणाऱ्यांनी जाऊन हा चित्रपट पाहावा, असा आग्रहसुद्धा त्याने केला. 'तुमच्यासाठी (काँग्रेससाठी) ही आत्मपरीणणाची वेळ आहे हे मी जाणतो. पण, मी राहुल गांधी आणि काँग्रेसमधील इतर वरिष्ठ नेत्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांनाही हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देतो जेणेकरुन हा चित्रपट त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल', असं विवेक 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासापासून प्रेरणा घेत तुम्हीही खूप काही शिकू शकता, एक चांगलं नेतेपद भुषवू शकता, ही बाबही त्याने अधोरेखित केली. मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपला मिळालेलं हे अद्वितीय यश चित्रपटगृहांमध्ये जाऊन 'पीएम नरेंद्र मोदी' पाहून साजरा करा, असं आवाहन त्याने सर्वांनाच केलं. 


लोकसभा निवणुकांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाला विरोधी पक्षांकडून प्रदर्शनापूर्वीच विरोध करण्यात येत होता. पण, अखेर तारखांमध्ये झालेल्या या दिरंगाईमुळे थेट विजयी पताका फडकवल्यानंतरच हा अद्वितीय प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, असं म्हणायला हरकत नाही.