एअरपोर्टवर बॉम्बची अफवा, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा
न दिल्लीच्या इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दिल्लीच्या इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात येत होती. त्यामुळे थोडेफार तणावाचे वातावरण निर्माण झाले. टर्मिनल्स 2 वर बॉम्ब असून वाचवू शकत असाल तर वाचवा असे सांगणारा निनावी कॉल आला. पोलीस या कॉल करणाऱ्याची सत्यता पडताळत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी सुरु केली असून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. पण तो स्वत: वरील आरोप फेटाळत आहे.
दिल्लीच्या इंदीरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) च्या टर्मिनल 2 वरून आंतरराष्ट्रीय उड्डाणासोबत आंतरदेशीय सेवाही सुरु असतात. इंडीगो, स्पाइस जेट आणि गो एअर च्या आंतरदेशीय फ्लाइट्स इथून उड्डाण घेतात. गुरुवारी स्वातंत्र्य दिन असल्याने प्रत्येक व्यक्ती आणि फोन कॉल्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर इथली सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. आतापर्यंत अशाप्रकारचे आलेले कॉल हे अफवाच असल्याचे समोर आले आहे. पण यासंदर्भात कोणताही धोका सुरक्षा यंत्रणेला पत्करायचा नाही आहे.
अशाप्रकारे कॉल करुन नागरिकांमध्ये भीती पसरवणे हे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकरणात दोषी आढळलेल्यांना आजीवन कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. काही दिवसांपूर्वीच एका व्यावसायिकाला अशी शिक्षा झाली आहे. आपल्या गर्लफ्रेंडसाठी त्याने फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवली होती.