इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर येथे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. येथील सांघी कॉलनी परिसरात हा प्रकार घडला. कमलेश साहू असे या तरुणाचे नाव असून त्याने गुरुवारी रात्री तरुणीवर हल्ला चढवला. त्याने कोयत्याने तरूणीचा चेहरा, मान आणि पाठीवर तब्बल ३८ वार केले. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि कमलेश एकाच परिसरात राहत होते. शाळेत असल्यापासून कमलेशचे या तरुणीवर प्रेम होते. महाविद्यालयात असतानाही त्याने तरुणीला प्रपोज केले होते. मात्र, तिने नकार दिल्यानंतर कमलेशने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 


यानंतर संबंधित तरुणी नोकरीसाठी इंदोरमध्ये राहायला आली. तेव्हा कमलेशने फेसबुक लोकेशनद्वारे तिचा पत्ता शोधून काढला व इंदोरमध्ये आला. तरूणीचा नकार ऐकून कमलेशचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याने तरुणीला ठार मारायचे ठरवले. गुरुवारी ही तरूणी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर कमलेशने तिला गाठले. तुझ्यासाठी मी जितके रक्त वाहिले आता तेवढेच तुझेही वाहायला पाहिजे, असे बोलत त्याने तरुणीवर हल्ला चढवला. या घटनेनंतर पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेतले आहे.