Mamata Banerjee Car Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात झाला आहे. या अपघातात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना हा अपघात झाला आहे. 


असा झाला अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमान जिल्ह्यात गेल्या होत्या. परतीचा प्रवास त्या हेलिकॉप्टरने करणाऱ्या होत्या. खराब हवामानामुळे त्यांना रस्त्याचा मार्ग निवडला. पाऊस आणि धुकं यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्धमानमधील जीटी रोडवर चालकाने अचानक एमर्जन्सी ब्रेक दाबला आणि कार जागीच थांबली त्यामुळे ममता यांना डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर लगेच त्या कोलकाताला रवाना झाल्या. 


यापूर्वीही ममता बॅनर्जी झाल्या होत्या अपघातग्रस्त


यापूर्वी 2023 मध्ये ममता बॅनर्जी अपघातग्रस्त झाल्या होत्या. सिलुगुडी येथे ममता बॅनर्जी या एका चार्टड प्लेनने प्रवास करत होत्या. त्याचवेळी एक विमान या विमानासमोर आलं. मात्र वैमानिकानं तात्काळ 6 हजार फूट विमान खाली आणलं. त्यानंतर वैमानिकानं नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनेट एअरपोर्टवर विमान सुखरूप उतरवलं. मात्र यात ममता बॅनर्जी यांच्या पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. 


ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून स्वबळावर लढण्याचा निर्णय


दरम्याान, लोकसभा निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधून स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. भाजपला पराभूत करण्यासाठी आपला पक्ष पुरेसा आहे असं ममता बॅनर्जींनी म्हंटलंय. राहुल गांधींच्या न्याय यात्रेबाबत आपल्याला माहितीही देण्यात आलेली नाही असंही ममता बॅनर्जींनी म्हंटलंय. मात्र आपण इंडिया आघाडीचा भाग आहोत असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलंय. ममता बॅनर्जींच्या या एकला चलो रेच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीतील फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या आधारस्तंभ आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलीय.