बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड
बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी यश मिळाले.
लखनऊ - बुलंदशहर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राज याला अटक करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना गुरुवारी यश मिळाले. 'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी योगेश राज पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासात मोठे यश मिळाले असून, प्रमुख सर्व आरोपींना बेड्या घालण्यात पोलिसांना यशस्वी ठरले आहेत. या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि पोलिस अधिकारी सुबोधकुमार सिंह यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करणारा कलुआ याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच योगेश राजला ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या महिन्यात ३ डिसेंबरला उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये पोलिस अधिकारी सुबोधकुमार सिंह आणि स्थानिक तरुण सुमित यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना बुलंदशहरचे पोलिस अधीक्षक प्रभाकर चौधरी म्हणाले की, ३ डिसेंबरला हिंसाचार सुरू असताना सुबोधकुमार सिंह यांनी स्वबचावासाठी त्यांच्या पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता. त्यातील एक गोळी सुमित कुमार यालाही लागली होती. यानंतर जमावाने त्यांना घेरून त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जमावाने त्यांना जाळण्याचाही प्रयत्न केला होता.
बुलंदशहर प्रकरणातील आरोपींकडे केलेल्या चौकशीत कलुआनेच सुबोधकुमार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती मिळाली होती. त्याने सिंह यांचा अंगठ्यावरही वार केले होते. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे.