PM Modi Meets Xi Jinping In BRICS Summit: पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या बाजूने सुरु असलेल्या हलचालींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहान्सबर्ग येथे 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपींग यांच्याशी चर्चा केली. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. प्रधानमंत्री मोदींनी क्षी जीनपींग यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये भारत-चीन सीमेवरील पश्चिमेकडील भागात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील अनुत्तरित मुद्द्यांबद्दल भारताला असलेली चिंता बोलून दाखवली.


मोदींनी चर्चेत काय सांगितलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि चीनदरम्यानचे संबंध सामान्य करण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. सीमेजवळच्या भागांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान दोन्ही बाजूंकडून होणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा मोदींनी अधोरेखित केली. पूर्व लडाखमधील वादासंदर्भात परराष्ट्र सचिव क्वात्रा यांनी, "पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सैनिकांना तातडीने परत बोलवण्याचे आणि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यासंदर्भातील निर्णयावर एकमत झालं," अशी माहिती दिली. 


मागील वर्षीही झालेली चर्चा


दोन्ही देशांमध्ये सीमेवर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडोनेशियातील बालीमध्ये इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको विडोड यांनी आयोजित केलेल्या जी-20 डीनरमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जीनपिंग यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं सांगितलं गेलं. लडाखमधील वादानंतर पहिल्यांदाच हे 2 नेते भेटले होते. भारत-चीनमधील लडाख येथील ताज्या संघर्षानंतर पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात हस्तांदोलन केलं होतं.



मे 2020 मध्ये झालेला संघर्ष


मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील सीमाभागाजवळ भारत आणि चीनदरम्यान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. दोन्ही देशांनी व्यापारी आणि राजकीय तसेच लष्करी चर्चेनंतर या क्षेत्रातील लष्कर दोन्ही देशांनी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


लष्करी अधिकाऱ्यांच्याही बैठका


भारत आणि चीनदरम्यान 13 आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या 19 व्या बैठकीदरम्यान पूर्व लडाखमधील देपसांग आणि डेमचोक संदर्भात निकाली न निघालेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीय करण्यात आलं. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी जारी केलेल्या संयुक्त पत्रकामध्ये 'सकारात्मक, रचनात्मक आणि प्रदीर्घ' चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही पक्षांनी निकाली न निघालेले मुद्दे सोडवण्यासाठी सहमती दर्शवली. उच्चस्तरीय चर्चेनंतर काही दिवसांनी दोन्ही बाजूच्या लष्करी तुकड्यांमधील स्थानिक कमांडर्सने देपसांग आणि डेमचोक संदर्भातील मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आयोजित करुन चर्चा केली.