Crime By Bride In Jaipur: राजस्थानमधील जयपूरमध्ये नुकतेच लग्न झालेल्या एका तरुणाबरोबर फारच धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने लग्न करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला लाखो रुपये दिले. त्यानंतर मंदिरामध्ये दोघांनी एकमेकांना वरमाला घालून लग्न लावण्यात आलं. लग्नानंतर नववधू सासरी पोहोचली. मात्र तिच्या कटाबद्दल सासरच्या मंडळींना थोडी सुद्धा कल्पना नव्हती. या तरुणीसंदर्भातील सत्य समोर आल्यानंतर मुलाच्या घरच्यांना मोठा धक्काच बसला.


लिव-इन-रिलेशनशिपची कागदपत्रं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, जयपुरमधील बिंदायका येथील तरुणाने शेजाराच्या ओळखीतील उत्तर प्रदेमधील एका मुलीशी लग्न केलं. लग्न ठरल्यानंतर मुलीचे वडील पप्पू यादव यांनी लग्न लावून देणाऱ्या एजंट खानच्या माध्यमातून दीड लाख रुपयांची मागणी केली. 16 एप्रिल रोजी पप्पू यादव हा या पीडित मुलाच्या शेजारी राहणाऱ्या गोपालबरोबर जयपूरमधील एका हॉटेलमध्ये पोहचला. तिथेच पप्पू यादवने मुलगी अंतिमाच्या (23) लग्नासंदर्भात चर्चा केली आणि 19 एप्रिल रोजी कोर्टामध्ये स्टॅम्प पेपरवर लिव-इन-रिलेशनशिपची कागदपत्रं तयार करण्यास संमती दिली. त्यानंतर गणपती मंदिरामध्ये अंतिमा आणि या तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं. त्यानंतर एजंटने 1 लाख रुपये रोख आणि 55 हजार ऑनलाइन माध्यमातून घेतले.


शरीरसंबंध ठेवण्यास नकार


लग्न करुन घरी आलेल्या नव्या नवरीचं म्हणजेच अंतिमाचं सासरच्या मंडळींनी जोरदार स्वागत केलं. घरातील सर्व मंडळी फार आनंदात होती. शेजाऱ्यांना मिठाईही वाटण्यात आली. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री अंतिमाने शरीरसंबंध ठेवण्यास नकार देताना तरुणाला वेगवेगळी कारणं दिली. अंतिमाच्या डोक्यात शिजत असलेल्या कटाची तिच्या नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.


तो सकाळी झोपेतून उठला अन्...


22 एप्रिलच्या रात्री अंतिमा नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्याबरोबर बेडरुममध्ये झोपली. मात्र सकाळी या तरुणाला जाग आली तेव्हा पत्नी घरात नसल्याचं त्याला समजलं. त्याने तिचा शोध घेतला मात्र ती कुठे गेली याबद्दल घरात कोणालाच काही माहिती नव्हती. त्यानंतर घरातील तिजोरीमधून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचं दिसलं. त्यावेळेस घरच्यांना या तरुणीच्या कटाबद्दल समजलं.


...म्हणून इतक्या महिने केली नाही तक्रार


फसवणूक झालेल्या तरुणाने एजंट आणि लग्न लावून देणाऱ्या शेजाऱ्याशी संपर्क साधला. त्या दोघांनाही या तरुणाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. अनेक महिने यासंदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न हा तरुण करत होता. समाजामध्ये नाचक्की होईल या भीतीने कुटुंबाने या प्रकरणी पोलीस तक्रार केली नाही. मात्र पैशांची देवाणघेवाण झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता फसवणूक झालेल्या नवऱ्या मुलाने पोलिस तक्रार केली असून पोलिसांनी या तरुणीचा आणि तिच्या सहकाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.