शहाजहाँपूर : लग्नामधील वरातीत नवरी-नवऱ्याकडची मंडळी बेभान होऊन नाचतात. त्यात नागिन डान्स हा प्रकार विशेष लोकप्रिय आहे. मात्र हा नागिन डान्स एका तरुणाचे लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहजहाँपूरमध्ये ही घटना घडलीये. वरातीत नवऱ्या मुलाने नागिन डान्स केला म्हणून नववधूने लग्नच मोडले. शहाजहाँपूरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय प्रियंका त्रिपाठीचे अनुभव मिश्रा याच्याशी लग्न ठरले होते. लग्नाआधीचे सर्व विधी पार पडले होते. अनुभव वरात घेऊन प्रियंकाच्या घरीही पोहोचला. 


तेव्हा डीजेवाल्यांनी नागिन गाणे वाजवले. हे गाणे ऐकल्यानंतर मात्र अभिनवला नाचण्याचा मोह आवरला नाही आणि तो या गाण्यावर बेभान होऊन नाचू लागला. त्याचे मित्रही त्याच्यावर नोटांचा वर्षाव करत होते. हा सगळा प्रकार पाहून प्रियंकाला प्रचंड संताप आला. प्रियंकाच्या घरच्यांचीही मान शरमेने खाली गेली. 


याचवेळी प्रियंकाने अशा मुलाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि जाहीरही केला. प्रियंकाच्या घरच्यांनी तसेच मुलाकडच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र प्रियंका आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिचा निर्णय मान्य केला आणि वरात तशीच मागे परतली.