सात फेऱ्यांच्या वेळी नववधू असं काय म्हणाली की, नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं
नववधूने लग्नाच्या दिवशी फेऱ्यांच्या वेळेला सांगितलं की, तिला हे लग्न करायचं नाही, कारण...
मुंबई : लग्न ही सगळ्यांच्याच आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. कारण यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार असते. अशावेळी लग्नात सगळं काही सुरळीत व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु जर लग्नाच्याच दिवशी एखाद्याचं लग्न तुटलं तर? असं होण्याचा कोणी विचार देखील करु शकत नाही. परंतु अशी घटना एका लग्नात घडली आहे. जिल्ह्यातील साहपूर गावातील वधूने फेऱ्यांच्या वेळी लग्न करण्यास नकार दिला. ज्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. या नववधूने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं ते आश्चर्यकारक होतं.
नववधूने लग्नाच्या दिवशी फेऱ्यांच्या वेळेला सांगितलं की, तिला हे लग्न करायचं नाही, कारण तिला नवरदेव आवडलेला नाही. नववधूचा हा युक्तिवाद ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
वऱ्हाडी मंडळींनी कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण सर्वच अपयशी ठरले. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही बाजूचा विचार करुन तोडगा काढला.
नक्की काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, साहपूर येथील एका तरुणीचा विवाह आमला येथील लक्ष्मीपूर गावातील तरुणाशी झाला होता. 20 एप्रिलला थाटामाटात वरात निघाली आणि नववधूच्या घरात येऊन पोहोचली. तोपर्यंत सगळंच चांगलं चाललं होतं. त्यानंतरचे सगळे विधी देखील पार पाडले गेले.
यानंतर वराला पुष्पहार घालण्यासाठी वधूला बोलावले असता, तेव्हा मात्र नवरदेवाला पाहून नववधूला धक्का बसला. त्यावेळी कुटुंबीय आणि वडिलांच्या जबरदस्तीने नववधूने नवरदेवाला पुष्पहार घातला, मात्र त्यानंतर वधूने फेरे करण्यास विरोध करायला सुरुवात केली.
जेव्हा वधूला फेऱ्यांसाठी बोलावण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. हळुहळु हे प्रकरण लग्नात उपस्थित सर्व लोकांपर्यंत पोहोचले. यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. परंतु खूप समजावूनही नववधू लग्न करण्यास तयार नव्हती.
म्हणून शेवटी पोलिसांना बोलावण्यात आलं. परंतु संपूर्ण रात्र गेली तरी, सकाळी दहा वाजेपर्यंत काहीच पर्याय निघाला नाही म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना त्याचा झालेला खर्च भरुन देण्यासाठी सांगितलं आणि हे प्रकरण शांत केलं.