देहरादून : उत्तराखंडची राजधानी देहरादूनच्या गढी कँट क्षेत्रात येणाऱ्या बीरपूरमध्ये शुक्रवारी सकाळी पूल कोसळून मोठा अपघात झालाय. हा पूल तब्बल ११५ वर्ष जुना होता. या घटनेत कोसळलेल्या पुलाच्या मलब्याखाली दोघांना आपले प्राण गमवावे लागलेत... तर अनेक जण जखमी झालेत. अनेक गाड्याही या कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकल्यात. ही घटना पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची सूचना मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, आर्मी आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. खोल आणि तेजीनं वाहणाऱ्या नदीमध्ये रेस्क्यू कार्य सुरू आहे.



कसा घडला अपघात?


शुक्रवारी सकाळी रेतीनं भरलेला डम्पर नदीवरच्या पुलावरून जात होता. यावेळी अचानक हा ११५ वर्ष जुना पूल कोसळला आणि रेतीनं भरलेल्या डम्परसोबतच या पुलावरून प्रवास करणाऱ्या दोन बाईकही खाली कोसळल्या. 


या घटनेत बाईकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. बाईकस्वार तरुण वीरपूरमध्ये एक रेस्टॉरन्ट चालवत असल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. 


बचाव दलानं आत्तापर्यंत तीन जखमींना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश मिळवलंय. तर दोन मृतदेहही बाहेर काढण्यात आलेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलंय.