नवी दिल्ली : देशाचे जवान आपल्या घरापासून दूर देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कसे दिवसरात्र डोळ्यात तेल घालून उभे असतात हे आपणा सर्वांना माहिती आहे. काही सिनेमांमधूनही हे बघायला मिळतं. पण आता सैनिक खरंच कशा स्थितीत देशाचं रक्षण करतात हे दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीय जवानांचे आपल्या सीमेचे रक्षण करतानाचे हे फोटो पाहून तुमच्या मनात त्यांच्याविषयी आणखीन आदर वाढणार आहे. या फोटोंमध्ये बीएसएफचे जवान पूरामध्ये छातीपर्यंत वर आलेल्या पाण्यात आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. अशा स्थितीतही ते जराही न डगमगता दुश्मनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष देऊन आहेत.  




बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. परंतु अशा कठीण स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत.



बीएसएफने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात छातीपर्यंत पाण्यातही बीएसएफ जवान सीमेवर खडा पहारा देत आहेत. ‘बॉर्डरवर आणखी एक दिवस,’ असं बीएसएफने फोटो शेअर करताना लिहिलं आहे. बीएसएफ जवानांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर अनेक ट्विटराईट्सनी प्रतिक्रियाही दिली आहे.