श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन ऑलआऊट'मध्ये सुरक्षादलाला मोठं यश मिळालंय. बडगाम जिल्ह्यात सुरक्षादलानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. बडगाम जिल्ह्यातील चंदोराच्या गोपालपोरा भागात ही चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाच्या हाती लागली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री सुमारे १.०० वाजल्याच्या सुमारास दहशवाद्यांना धुंडाळून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. पहाटे ३.०० वाजल्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी पकडले जाण्याच्या भीतीनं सुरक्षादलावर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षादलाकडूनही जोरदार प्रत्यूत्तर देण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षादलानं केलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. हे ऑपरेशन सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू कश्मीरच्या पोलिसांच्या टीमनं संयुक्तरित्या राबवलं. गोळीबार थांबल्यानंतर दोन दहशतवाद्यांचं शव ताब्यात घेण्यात आलंय. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांजवळून एके-४७ आणि १ पिस्तूल जप्त करण्यात आलंय.  


सुरक्षादलानं संपूर्ण भागाला घेराव घातलाय. सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची शंका अजूनही कायम असल्यानं हे सर्च ऑपरेशन अद्याप सुरू ठेवण्यात आलंय. 


यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतावादी ठार झाला होता. त्याची ओळख अहमद राठर म्हणून करण्यात आलीय. गेल्या वर्षी लष्कर ए तोयबाचा कमांडर नवीद जट याला रुग्णालयातून पळून जाण्यासाठी अहमद राठरनंच मदत केली होती. तो पुलवामा जिल्ह्यातील बेगमबाग काकापुरा भागाचा रहिवासी होता. या चकमकीत सेनेनं एका सैनिकालाही गमावलंय तर अन्य एक सैनिक गंभीररित्या जखमी झालाय.