अर्थसंकल्प २०१८: टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय होणार फायदा
१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली काय घोषणा करणार? हे तर अर्थसंकल्पात कळेलच. मात्र, त्यापूर्वी टॅक्स कन्सल्टन्ट्सने सर्वेक्षण करणं सुरु केलं आहे.
अपेक्षा केली जात आहे की, यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्समध्ये अधिक सूट दिली जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात नव्या इन्कम टॅक्स स्लॅबच्या माध्यमातून सरकार मोठी सूट जाहीर करु शकते.
सर्वेक्षणात समोर आलं आहे की, वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकार २०१८-१९ मध्ये इन्कम टॅक्स स्लॅब आणि रेटमध्ये बदल करु शकते. टॅक्स कन्सल्टन्ट EY ने केलेल्या प्री बजेट सर्वेक्षणात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खर्च करण्यासाठी हातात पैसा हवा
सर्वेक्षणातील ६९ टक्के नागरिकांनी सांगितलं की, खर्च करण्यासाठी आपल्या हातात अधिक पैसे राहणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकार टॅक्सेशनसाठी थ्रेसहोल्ड लिमिट वाढवण्याची शक्यता आहे. ५९ टक्के नागरिकांच्या मते, आऊटडेटेड डिडक्शनला स्टँडर्ड डिडक्शनसोबत रिप्लेस केलं जाऊ शकतं. यामुळे नोकरदार वर्गावरील टॅक्सचा बोजा कमी होईल.
सर्वेक्षणात कुणाला केलं सहभागी?
EY तर्फे करण्यात आलेला हा सर्वेक्षण जानेवारी महिन्यात करण्यात आलं. यामध्ये १५० सीएफओ, टॅक्स हेड आणि वरिष्ठ वित्त व्यावसायिकांचा समावेश होता. सर्वेक्षमातील ४८ टक्के नागरिकांना अपेक्षा आहे की, अर्थमंत्री कॉर्पोरेट टॅक्स २५ टक्के करतील मात्र, सरचार्ज चालूच राहील.
कॉर्पोरेट सेक्टरला मोठी अपेक्षा
सर्वेक्षणातील ६५ टक्के नागरिकांच्या मते, सध्या डिव्हिडेंटच्या टॅक्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही. २४ टक्के नागरिकांनी सांगितलं की, कॉर्पोरेट टॅक्सवरचा बोजा कमी होईल. तसेच सरकार टॅक्स रेट १० टक्के करु शकते.