१२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटींची गरज- अर्थमंत्री
१२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपये पाहीजे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सांगितले.
नवी दिल्ली : १२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपये पाहीजे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सांगितले. रेल्वेत पीपीपी मॉडेलने पैसे येतील असेही त्या म्हणाल्या. पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सितारामण या संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. नवीन औद्योगिक कॉरिडोर बनवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. कॉरिडोर हायवेला जोडण्याचे काम वेगात सुरु असल्याचेही त्या म्हणाल्या. प्रत्येक घरात वीज, शौचालय देण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था
आपली अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात न्यू इंडीयावर जोर आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती हा बदल जाणवू शकेल. सध्या आपली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जी आधी अकराव्या क्रमांकावर होती. अन्न सुरक्षेवर दुप्पट खर्च केला जाईल तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वात प्रत्येक लक्ष्य पूर्ण करु असेही यावेळी निर्मला सितारामण म्हणाल्या.