Budget 2019: तर एसी, टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन महागणार
टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता
नवी दिल्ली : बजेट 2019 नंतर टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता आहे. जर सरकारने कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लयांसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) ची मागणी मान्य केली तर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊ शकतात. अंतरिम बजेटच्या आधी सीईएएमएने सरकारकडे आयात होणारी उत्पादने जसे टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनवर कस्टम ड्यूटी वाढवण्य़ाची मागणी केली आहे.
सीईएएमएने सरकारकडे कंप्रेसर, ओपन सेल आणि डिस्प्ले पॅनल सारख्या उत्पादनांवर कस्टम ड्यूटी वाढवण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने घरगुती उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी याची मागणी केली आहे. आयात होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ५ टक्के ऐवजी १० टक्के कस्टम ड्यूटी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष कमल नंदी यांनी म्हटलं की, सरकारच्या या पाउलामुळे देशातील उत्पादकांना प्रतिस्पर्धात्मक किंमतीत उत्पादन तयार करण्यासाठी मदत मिळेल. बजेट 2018 मध्ये सरकारने मोबाईल फोनवर कस्टम ड्यूटी १५ वरुन २० टक्के केली होती.
सरकारने बजेट 2018 मध्ये मोबाईलच्या काही पार्ट्स आणि टीव्हीच्या काही पार्ट्सवर कस्टम ड्यूटी १० टक्क्यांवरुन १५ टक्के केली होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत असल्याने आणि कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने सरकारने १० किलो पेक्षा कमी वॉशिंग मशीन, हाउस होल्ड रेफ्रिजरेटर आणि एसीवर कस्टम ड्यूटी १० टक्क्यावरुन २० टक्के केली होती. यावर्षी १ फेब्रुवारीला पियूष गोयल अंतरिम बजेट सादर करणार आहेत.