Union Budget 2024: 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. 58 मिनिटांच्या आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी ते महिला वर्गांसाठी अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या सूर्योदय योजनेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे की, सरकारने सूर्योदय योजनेची सुरुवात केली आहे. या अतर्गंत घराच्या छतांवर सोलर सिस्टम लावण्यात येईल. या योजनेची पहिल्यांदा घोषणा राम मंदिर लोकार्पण सोहळ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केली होती. अर्थमंत्र्यांनी आज या योजनेबाबत माहिती दिली आहे. 


सूर्योदय योजनेंतर्गंत छतांवर सोलर पॅनल लावल्याने दर महिना करोडो कुटुंबीयांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ मिळणार आहे. तसंच, त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मोफत सोलर वीज आणि अधिशेष वीज वितरण कंपन्यांना विकल्यास कुटुंबीयांना दरवर्षी 15 ते 18 हजार रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे. त्याचबरोबर याच्या मदतीने वाहनांना चार्जिंगही करता येऊ शकते. घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्याने व इन्स्टॉलेशनसाठी मोठ्या संख्येने लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 


युवकांसाठी रोजगार उपलब्ध होणार 


छतावर सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी मोठ्या संख्येने वेंडर्सची आवश्यकता निर्माण होणार. अशावेळी स्टार्टअप सुरू करणाऱ्या लोकांसाठी ही चांगली संधी आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे की, निर्माण, इन्स्टॉलेशन आणि दुरुस्तीसारखे कौशल्य असणाऱ्या युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे. 


2 कोटी अतिरिक्त घरे बांधणार 


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत (ग्रामीण) सुरू असून आम्ही तीन कोटी घरांचे उद्दिष्ट्ये पूर्ण केले आहे. येत्या पाच वर्षांत दोन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचे काम सुरु केले जाणार आहे.


अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा


गर्भशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लसीकरणाला चालना दिली जाणार आहे. याअंतर्गंत 9 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींचं मोफत लसीकरण केले जाणार आहे. तसंच, आत्तापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले आहे. त्याचे उद्दिष्ट 2 कोटींवरुन 3 कोटी करण्यात आले आहे.