Budget 2024: 25 कोटी भारतीयांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं, अर्थमंत्र्यांचा दावा; शेतकरी, तरुणांबद्दलही बोलल्या
Budget 2024 Updates FM Nirmala Sitharaman Speech Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना चार मुख्य घटकांच्या विकासावर केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं आहे.
Budget 2024 Updates FM Nirmala Sitharaman Speech Points: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार घटकांच्या विकासावर सरकारचं लक्ष असल्याचं म्हटलं आहे. निर्मला सितारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सर्वात आधी गरिबी दूर करण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवला. त्याचप्रमाणे शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी सरकारने काय केलं आणि भविष्यात काय करणार आहे याची माहिती निर्मला सितारमण यांनी दिली आहे.
आपल्याला गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार घटकांवर लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या गरजा, आकांशा आणि विकास यालाच आमचं पहिलं प्राधान्य आहे. या चारही घटकांना सरकारची मदत मिळाली आहे, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या.
पूर्वी गरीबांबद्दल केवळ घोषणा दिल्या जायच्या. मात्र यामधून फार किमान गोष्टी हाती लागल्या, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या. ज्या वेळेस गरीब सशक्त होतात आणि विकासाचा भाग बनतात तेव्हा सरकारचीही त्यांना मदत करण्याची क्षमता वाढते. मागील 10 वर्षांमध्ये सरकारने 25 कोटी नागरिकांना गरिबीमधून बाहेर काढण्यास मदत केली आहे. त्यांचे सशक्तीकरण आणि विकास आपल्या देशाला पुढे घेऊन जाणार आहे, असं विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.
पीएम जनधन खात्यांवरुन थेट 34 लाख कोटी रुपयांचा थेट फायदा गरजूंपर्यंत पोहचवण्यात आला. यामुळे सरकारचा भरपूर निधी वाचला. वाचवलेल्या या पैशांमुळे जास्तीत जास्त निधी गरजूंपर्यंत पोहचवता आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून 78 लाख स्ट्रीट व्हेंडर्सला मदत करण्यात आली. सलग तिसऱ्यांदा 2.3 लाख लोकांना मदत मिळाली. आदिवासी गटांना पीएम जनमन योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कलाकार आणि कारागिरांना मदत करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग आणि ट्रान्स जेंडर्सला मदत करण्यासाठीही विशेष योजना करण्यात आल्या आहेत. आम्ही कोणालाही मागे सोडलेलं नाही, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.
पीएम किसान योजनेअंतर्गत थेट 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. तसेच 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम फसल बिमा योजनेअंतर्गत पीक विमा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी देशासाठी आणि जगासाठी अन्नाचं उत्पादन घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचं निर्मला सितारमण यांनी सांगितलं.
निर्मला सितारमण यांचा हा अर्थमंत्री म्हणून सहावा अर्थसंकल्प आहे. मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या सर्वांना त्यांनी मागे टाकलं आहे. या मंत्र्यांनी प्रत्येकी 5 अर्थसंकल्पीय भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळाल्यावर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाची सूत्र सोपवली. तेव्हापासून आज तागायत सीतारमण यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे असं म्हणायला हरकत नाही.