नवी दिल्ली: अयोध्येत राम मंदिर हे उभारलेच पाहिजे. तरच भारतातील मुस्लिम समाज शांतता आणि सन्मानपूर्वक जीवन जगू शकेल, असे वक्तव्य राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख गैयरुल हसन रिझवी यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्यावरुन सध्या देशभरातील वातावरण तापले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. 


या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने मध्यस्थी करावी, अशी काही मुस्लिम संघटनांची मागणी आहे. जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेला तणाव निवळेल. 


गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे अहवाल अनेक संघटनांनी आपल्याला पाठवले आहेत, असे रिझवी यांनी सांगितले. 


अयोध्येत मशीद बांधावी किंवा नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी, या मताचा मी नाही. या जागेशी देशातील १०० कोटी हिंदूंच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी राम मंदिर बांधायला पाहिजे. जेणेकरून देशातील मुस्लिम समाज आदरपूर्वक आणि शांततापूर्ण जीवन जगू शकेल, असे रिझवी यांनी सांगितले.