इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना महापालिकेने चांगलाच झटका दिला आहे. ज्या घरासाठी त्यांनी मारहाण केली होती, तेच घर जमीनदोस्त करण्यात आलंय. २६ जून रोजी जेव्हा पालिकेचे अधिकारी इमारत पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी वाद होऊन आकाश विजयवर्गीय यांनी क्रिकेटच्या बॅटने एका अधिकाऱ्यावर हल्ला चढवला होता. त्यानंतर आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश न्यायालयाने या इमारतीला जमीनदोस्त करण्याच्या इंदूर महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली होती. ही इमारत जमीनदोस्त करण्यापूर्वी त्यात राहणाऱ्या कुटुंबांना दोन दिवसांच्या आत तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते.



इंदूरचे भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र असलेल्या आकाश यांनी मोडकळीस आलेल्या इमारतीवर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात बॅटनं मारहाण केली. इंदूर शहरातल्या गंजी कंपाऊंडमध्ये एक मोडकळीस आलेल्या इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले होते. त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी आकाश विजयवर्गीय यांनी दबाव टाकला होता. मात्र हे अधिकारी कारवाईवर ठाम असल्यामुळे आकाश यांनी थेट या अधिकाऱ्यांवर हात उचलला होता.