बसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट
ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले.
बुलंदशहर : लोकसभा निवडणूक 2019 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी झाले. उत्तर प्रदेशच्या 8 जागांवर शांततेत मतदान झाले. पण यूपीच्या बुलंदशहरात एक अजब घटना समोर आली आहे. ज्या पक्षाला मत द्यायचे होते त्याला ते न पडल्याने एक मतदार हैराण झाला. आपल्याकडून चूक झाल्याचे मानत त्याने स्वत:चे बोट कापले. बुलंदशहर येथील शिकारपूरमधुन हा प्रकार समोर आला. पवन कुमार असे या मतदार तरुणाचे नाव असून तो अब्दुल्लापूर हुलासपूर गावचा रहिवासी आहे.
बुलंदशहरमध्ये दिवसभर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पवन कुमार देखील मतदान केंद्रात गेला. त्यानेही हाताला शाई लावून बटण दाबले. पण मतदान यंत्रावरील दाबलेले बटण हे भाजपाचे होते हे त्याच्या घरी गेल्यावर लक्षात आले. पवन कुमारला बसपाला मत द्यायचे होते पण चुकून भाजपाला मत गेले. आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे त्याला वाटू लागले. या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप झाला. ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले.
या घटनेनंतर त्याच्या घरातील मंडळी घाबरले. त्यांनी पवन कुमारला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर त्याला सोडण्यात आले. पवन कुमारने चुकून भाजपाच्या समोरील बटण दाबले. त्यानंतर त्याने मतदान केलेले बोट कापल्याचे पवनचा भाऊ कैलाश चंद यांनी सांगितले. असे करुन पवनने मायावती यांच्याबद्दल प्रेम दाखवल्याचेही कैलाश म्हणाले.