बुलेट ट्रेन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर- मेट्रो मॅन श्रीधरन
बुलेट ट्रेन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून केवळ श्रीमंतासाठीच असल्याचेही त्यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली : देशात सध्या 'बुलेट ट्रेन'चे वारे जोरदार वाहू लागले आहेत. बुलेट ट्रेन येण्याआधीच ती कशी असेल ? तिचा वेग किती असेल ? तिकिटं किती असेल ? अशा चर्चा रंगल्या आहेत. मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले इलात्तुवपिल श्रीधरन यांनी बुलेट ट्रेनवर गंभीर वक्तव्य केलंय. विनाकारण बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केलायं. बुलेट ट्रेन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून केवळ श्रीमंतासाठीच असल्याचेही त्यांनी म्हटलंय. बुलेट ट्रेनपेक्षा भारतीयांना सुरक्षित, आधुनिक, जलद रेल्वे यंत्रणेची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपाययोजना नाही
आपल्याकडे साधारण ७० टक्के ट्रेन वेळेवर म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र ५० टक्के ट्रेनच वेळेवर धावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे ट्रॅकवर दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू होतो. यासंदर्भात उपाययोजना करण्यास आपल्याला यश येत नसल्याचे कटू वास्तव त्यांनी मांडले आहे.
भारत २० वर्षे मागे
प्रगत देशांमध्ये अत्याधुनिक बुलेट ट्रेन पाहायला मिळतात. भारत या विदेशातील बुलेट ट्रेनच्या तुलनेत २० वर्षांनी मागे असल्याचेही त्यांनी म्हटलंय.