Burger King Removed Tomatoes from Menu : मागील काही दिवसांपासून महागाईचा आगडोंब माजला आहे. आधी कांदा, मग भाज्या आणि आता टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्यांना दोन वेळच्या अन्नासाठीही महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कांदा महाग झाला म्हणून त्याच्याशिवायच पदार्थ तयार करण्यात आले, टोमॅटो महागला तर त्यासाठीही पर्याय शोधण्यात आले. पण, काहींनी मात्र पर्यायच उपलब्ध नसल्यामुळं टोमॅटोलाच हद्दपार केलं. मॅकडॉनल्ड्स आणि सबवेमागोमाग आता यात बर्गर किंग (Burger King) चाही समावेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या दरांमुळं आता बर्गर किंगकडून त्यांच्या मेन्यूतून टोमॅटोच हद्दपार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतातील सर्व आऊटलेट्ससाठी हा नियम लागू असेल. ग्राहकांनाही याबाबतची रितसर माहिती देण्यात आली आहे. एशियन ब्रँड असणाऱ्या बर्गर किंगचे भारतात जवळपास 400 हून अधिक आऊटलेट्स आहेत. त्या सर्व आऊटलेट्समध्ये आता बर्गर आणि इतर पदार्थांमध्ये टोमॅटो वापरला जाणार नाहीये. पुरवठ्यामध्ये असणारा तुटवडा आणि गुणवत्तेच्या कारणास्तव कंपनीकडून टोमॅटो न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरवठा सुरळीत होताच टोमॅटो पुन्हा वापरात आणला जाई अशीही माहिती कंपनीनं दिली आहे. 


आम्ही टोमॅटो वापरत नाही.... 


सध्याच्या घडीला एकंदर परिस्थिती पाहता आपण टोमॅटोचा वापर थांबवल्याची माहिती एका नोटिसच्या रुपात बर्गर किंगकडून त्यांच्या सर्व आऊटलेट्समध्ये दर्शनीय स्थळी लावण्यात आली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार काही रेस्तराँमध्ये अतिशय विनोदी अंदाजाच ही नोटीस लावण्यात आली असून, 'आम्ही टोमॅटो वापरत नाही.... ', 'टोमॅटो सध्या सुट्टीवर आहे...' अशीही नोटीस लावण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : YouTube कडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तुमचाही व्हिडीओ डिलीट होईल जर... 


देशातील बहुतांश भागांमध्ये टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळं जेवणाच्या पदार्थांमधूनच तो दिसेनासा झाला आहे. अनेक गृहिणींसह चक्क आता क्विक सर्विस रेस्टोरेंट (QSR)नंही टोमॅटोचा वापर थांबवला आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये सध्या टोमॅटोचे दर अंशत: कमी झाले असले तरीही अद्यापही हे दर आणखी कमी होतील याचीच अनेकांना प्रतीक्षा आहे.